बेळगाव महानगरपालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असून अधिकृत उमेदवारांची यादी उद्या रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर केली जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली.
गोकाक येथील हिल गार्डन कार्यालयामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री एम. बी. पाटील, एल.हनुमंतय्या, नासिर हुसेन आदींच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत माजी आमदार आणि आमदारांसह स्थानिक नेत्यांची चर्चेद्वारे मते आजमावून ती पक्षांच्या वरिष्ठांकडे धाडण्यात आली होती.
त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बेळगाव महानगरपालिका निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावर घडविण्यास संमती दर्शविले आहे. त्याचप्रमाणे सदर निवडणूक रिंगणातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी उद्या रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर केली जाईल, असे आमदार जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे फटका बसलेल्यांना अद्याप पूर्णपणे नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागील वर्षातील अपघातग्रस्तांना देखील अद्याप परिहार धन मिळालेले नाही.
यंदा अतिवृष्टी व पुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत नुकसानभरपाई पोहोचलेली नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे संबंधितांना थेट नुकसानभरपाई देतील अशी आशा आहे, अशी अपेक्षाही आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.