Wednesday, November 27, 2024

/

‘तो ध्वज’ बनु शकतो निवडणुकीचा मुद्दा?

 belgaum

महानगरपालिका निवडणूक रणसंग्राममध्ये कोण बनेगा नगरसेवक? ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि या प्रक्रियेबरोबरच बेळगाव महापालिकेवर सत्ता कोणाची? कोणकोणते मुद्दे या निवडणुकीत गाजणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.बेळगाव महापालिकेवर सत्ता कोणाची येणार याचे उत्तर आत्ताच देता येणार नाही.

भाजप याव्यतिरिक्त काँग्रेसच्या कांही होट बँक असल्यामुळे त्यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर सत्ता कोणाची? किंवा जास्त नगरसेवक कोणाचे निवडून येणार? हे येणारा काळच ठरवणार आहे. जरी भाजपने पक्षाच्या बी -फाॅर्मवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असले तरी बेळगाव महापालिका निवडणुकीची नाळ ही मराठी व कन्नड भाषेची जोडली गेली आहे. त्यामुळे कितीही नाकारले तरी ही निवडणूक भाषिक वादावरच येऊन ठेपणार आहे.गतकाळातील घडलेल्या कांही घटना लक्षात घेता भाषिक वादावर म्हणजे कन्नड -मराठीवर ही निवडणूक होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या महापालिका निवडणुकीत कोण कोणते मुद्दे असणार? याचा अंदाज घेतला असता एकीकडे बेळगावचे स्मार्ट सिटीत रूपांतर होत असताना या योजनेच्या कामांवर प्रकाश टाकला जाणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहराचा कसा बट्ट्याबोळ झाला हे देखील दाखवून दिले जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामात होणारी दिरंगाई, निकृष्ट ढिसाळ काम, योजनेतील नियोजनाचा अभाव यासारखे मुद्दे निवडणुकीत उचलले जाऊ शकतात.

गेल्या जानेवारीमध्ये बेळगाव महापालिकेसमोर कानडी संघटनांनी अनाधिकृतपणे लाल -पिवळा झेंडा फडकविला आहे. हा वादग्रस्त झेंडा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो. कारण हा झेंडा हटवावा अशी समस्त मराठी भाषिकांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण समितीची आग्रही मागणी आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर भगवा ध्वज फडकावणे आणि अनाधिकृत लाल -पिवळा झेंडा हटविणे हाच या निवडणुकीतील सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो.

गेल्या कांही काळापासून असे निदर्शनास आले आहे की, कानडी संघटनांनी वारंवार चिथाणारी आंदोलने छेडणे आणि प्रशासनाने त्यांना पाठीशी घालणे, असे प्रकार घडल्यामुळे याची पडसाद देखील या निवडणुकीत उमटू शकते. एकंदर तसे पाहिल्यास बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत जे मुद्दे होते तेच मुद्दे या निवडणुकीत चर्चेत येऊ शकतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.