बेळगावातील केंद्रीय अबकारी आयुक्तालय आणि लेखा आयुक्तालयाचे नूतन केंद्रीय कर (जीएसटी) आयुक्त म्हणून बसवराज नालगावे यांनी काल मंगळवारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
बसवराज नलगावे हे 1994 च्या आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हीस) बॅचचे अधिकारी असून त्यांना सीमाशुल्क आणि केंद्रीय अबकारी खात्यातील सेवेचा व्यापक अनुभव आहे. महसूल खात्याच्या सेंट्रल जीएसटी विंगमधून त्यांनी चेन्नई, मुंबई, म्हैसूर आणि बेंगलोर याठिकाणी विभिन्न क्षमतेने काम केले आहे.
बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, विजापूर, बागलकोट, कोप्पळ, रायचूर, यादगीर, बिदर, गुलबर्गा आणि बेळ्ळारी अशा एकूण 11 जिल्ह्यात विस्तारलेले आहे.
या जिल्ह्यांमधून 2020 -21 सालात 1317.73 कोटी रुपये इतका जीएसटी महसूल जमा झाला आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या आर्थिक वर्षात जमा झालेला एकूण महसूल 2836.89 कोटी रुपये इतका आहे.
कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स (जीएसटी) बसवराज नालेगावी हे मूळचे बिदर जिल्ह्यातील असून सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर खात्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. बेळगाव येथील जीएसटी आयुक्त पदाचे अधिकार हाती घेण्यापूर्वी त्यांनी बेंगलोर सीमाशुल्क आयुक्त म्हणून सेवा बजावली आहे.