महापालिकेतील निवडून येणारा नगरसेवक मराठी भाषिक आणि मराठी मनाचा आदर ठेवणारा असावा, ज्या नगरसेवकाकडे गेल्यानंतर मराठी माणसाला आत कुठेही सल वाटणार नाही, असाच उमेदवार महापालिकेत निवडून पाठवायचा आहे.
भगव्याचा अपमान असू दे, मराठीचे खच्चीकरण असू दे, मराठी मनाचे पायमल्लीकरण असू दे किंवा येळ्ळूरच्या वेशीवरचा महाराष्ट्रराज्य फलक विध्वंसीकरणं असू दे प्रत्येक वेळी मराठी माणूस भरडला गेला आणि चिरडला गेला. लाठ्या काठ्या खाली झोडपला गेला. येळ्ळूरच्या प्रत्येक दारावर बसलेली कर्नाटकी पोलिसांची लाथ मराठी माणसाच्या कानात गुंजत आहे.
मराठी बायकांनी पसरलेले पदर पोलीस खात्यानी काठ्यांनी फाडून काढले, हे देखील मराठी माणूस विसरला नाही. 65 वर्षाचा रक्ताळलेला लढा सूर्य प्रकाशा सारखा तेजाने तळपत आहे. कर्नाटकी प्रशासनाला मराठी मनगटातील ताकत दाखवण्याची वेळ आता आली आहे.
हुतात्म्यांचे बलिदान देऊन मराठी महिलांच्या अश्रूवर पोसलेला हा लढा, नोकऱ्यावर तिलांजली देऊन हातात भगवा घेऊन लढलेल्या तरुणांचा हा लढा.. वीरांची ही गाथा अखंड गर्जत ठेवण्याची वेळ आता मराठी माणसाच्या हातात आली आहे. आपल्या हातातली ही सत्ता कर्नाटकच्या हातात न देण्याची ही संधी आता गमवायची नाही.
खांद्याला खांदा लावून लढायचं.. एकजुटीने भिडायचं… मराठी माणसालाच निवडायचं!!! मराठी विरोध्याना खड्यासारखं दूर करायच आणि बेळगाव मनपावर बहुमताने शिवरायांचा भगवा डौलाने फडकावयचा. आता फक्त आणि फक्त मिशन 40…!!!