बेळगाव तालुका आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सहाय्य धनापासून अद्याप वंचित असून ते धन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश दिला जावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
पी.एम.किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये तर राज्य सरकारने चार हजार रुपये असे एकूण 10 हजार रुपये इतके शेतकरी सहाय्यधन शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. तथापी कांही शेतकऱ्यांच्या खात्यात तो निधी जमा झाला, तर अनेक शेतकरी गेली दोन वर्ष झाली सहाय्य निधीपासून वंचीत आहेत.
यासंदर्भात कृषी खात्यात विचारणा करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. इथे जा तिथे जा, असे सांगण्यात येत असल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. तेंव्हा कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सहय्यधन निधी जमा करण्यासाठी संबधीत कर्मचाऱ्यांना आदेश देऊन वंचित शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा कृषी खात्याच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.