रायबाग (जि. बेळगाव) येथील हेस्कॉम कार्यालयावर एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी काल छापा टाकून महत्त्वाच्या फायली ताब्यात घेतल्या.
ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह विविध कामांसाठी रायबाग हेस्कॉम कार्यालयाकडून लाच मागितल्याच्या तक्रारी शेतकरी व नागरिकांकडून एसीबीकडे गेल्या होत्या.
रायबागच्या हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ट्रांसफार्मर, विद्युत खांब बसविण्यासह विद्युत वाहिन्या घालण्यासाठी पैशाची मागणी केली जात होती.
याची गांभीर्याने दखल घेऊन एसीबीच्या पथकाने रायबाग येथील हेस्कॉम कार्यालयावर काल सोमवारी छापा टाकला. यावेळी चौकशी सह महत्त्वाच्या फायली ताब्यात घेण्यात आल्या. एसीबीचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख नेमगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उपरोक्त कारवाईत उपपोलीस प्रमुख करूणाकर शेट्टी यांच्यासह बेळगाव, धारवाड, गदग व बागलकोट येथील एसीबीच्या अधिकार्यांचा सहभाग होता.