अपघातामुळे अथवा अन्य कारणाने शरीराचा एखादा अवयव तुटला तर ठराविक वेळेत तो पुन्हा आपल्या शरीराशी जोडला जाऊ शकतो, हे आवाहन सातत्याने करणाऱ्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या तज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे एका रुग्णाला त्याचा तुटलेला अंगठा पूर्ववत हाताशी जोडून दिला.
याबाबतची माहिती अशी की, हुबळी येथील एका 35 वर्षीय इसमाचा अंगठा यंत्रांमध्ये सापडून तुटला होता. गेल्या 27 जून रोजी सदर घटना घडली होती. त्यावेळी हुबळीच्या संबंधित डॉक्टरांनी विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांशी संपर्क साधून संबंधित रुग्णाला तुटलेल्या अंगठ्यासह बेळगावला पाठवले होते.
पूर्वकल्पना मिळाल्यामुळे विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी सर्व ती पूर्वतयारी केली. त्यानंतर जवळपास 11 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी संबंधित रुग्णाचा तुटलेला अंगठा त्याच्या शरीराशी पूर्ववत जोडला. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. विठ्ठल मालमदे, डॉ. रवी बी. पाटील, भूलतज्ञ डॉ. श्रीधर काथवटे, डॉ. अभिजीत, विवेक, शिवानंद, विशाल आणि विनोद यांचा सहभाग होता.
सदर यशस्वी शस्त्रक्रियेसंदर्भात बोलताना विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. रवी पाटील यांनी हुबळी येथील डॉक्टरांनी वेळीच आम्हाला माहिती देऊन त्या रुग्णाला तात्काळ आमच्याकडे धाडले, हे करताना त्यांनी तुटून शरीरापासून विलग झालेला अंगठा व्यवस्थित सुरक्षित ठेवून 4 तासाच्या आत आमच्याकडे धाडल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली असे सांगितले.
यापूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही यशस्वी केल्या असून एखादा अवयव शरीरापासून तुटल्यास तो व्यवस्थित सुरक्षित ठेवून 3 -4 तासाच्या आत रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यास तुटलेला अवयव शरीराशी पुन्हा जोडला जाऊ शकतो, असेही डॉ. रवी पाटील यांनी स्पष्ट केले.