सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली असली तरी या मोहिमेतील सावळा गोंधळ अद्यापही संपला नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लशीकरण मोहिमेअंतर्गत 45 वर्षे वयावरील नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण अद्याप सुरू आहे त्याचप्रमाणे याबरोबरच आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणालाही प्रारंभ झाला आहे.
तथापि गेल्या कांही महिन्यांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात वारंवार लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या देखील विविध लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारकडून कोविन पोर्टलवर नांवे नोंदणी करून घेतली जात असली तरी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मात्र ‘नॉन स्टॉक’ चे फलक झळकत असल्यामुळे नागरिकांना लस न घेताच हिरमुसले होऊन घरी परतावे लागत आहे. याखेरीज मोठ्या संख्येने लसीकरणासाठी नांवे नोंदविली गेली जात असल्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होत आहे.
शहरातील बीम्स हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्राच्या ठिकाणी तर आज सकाळी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे फेस मास्कसह सामाजिक अंतराच्या नियमाचा फार फज्जा उडाला होता. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही.
त्यामुळे नागरिकांची ही झुंबड पुन्हा कोरोनाच्या उद्रेकास निमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा एक तर कोविन पोर्टलवर नांव नोंदणी करून स्लॉट बुक करणाऱ्या नागरिकांना त्याप्रमाणे एक तर लस उपलब्ध करून दिली जावी अथवा लसीचा साठा उपलब्ध नसेल तर तशी पूर्वसूचना नागरिकांना मिळेल अशी व्यवस्था केली जावी, असे सखेद मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात आपले मत व्यक्त करताना किमान ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) या सेवाभावी संघटनेने केली आहे.