गतवर्षी पुराचा फटका बसलेल्या लोकांपैकी ज्या लोकांना अद्याप नुकसानभरपाईची रक्कम पूर्णपणे मिळालेले नाही त्यांना ती रक्कम त्वरित अदा केली जावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मागील वर्षी जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांची नांवे नुकसानभरपाईसाठी यापूर्वीच गेल्या फेब्रुवारी, मे आणि जुलै महिन्यात आपल्याला सादर करण्यात आली आहेत. लाभार्थींनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील केली आहे. सदर लाभार्थी हे अत्यंत गरीब असून ते कुली तथा रोजंदारी कामगार आहेत.
हातावर पोट असणारे हे लोक सध्या भाड्याच्या घरात राहत असून घर मालक त्यांच्याकडून अव्वाच्यासव्वा भाडे आकारत आहे. या लाभार्थी पैकी कांही लोकांना नुकसानभरपाईचा पहिला व दुसरा हप्ता मिळाला असला तरी उर्वरित रक्कम मिळालेली नाही. त्याचप्रमाणे कांही जणांना सरकारकडून अद्याप एक पैशाची नुकसान भरपाई मिळालेले नाही. याखेरीज काहीजणांना नुकसान भरपाई मंजूर झाल्याचे पत्र मिळाले आहे, मात्र नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.
आता जवळपास 2 वर्षे होत आली तरी नुकसान भरपाईची रक्कम अद्याप न मिळाल्यामुळे या लोकांना घरभाडे भरण्याबरोबरच चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. काहींनी सरकारच्या भरोशावर खाजगी सावकारांकडून कर्ज काढले आहे. ते कर्ज थकले आहे.
तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच संबंधित खात्याला नुकसानभरपाईची रक्कम त्वरित अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करते वेळी माजी नगरसेवक गुंजेटकर यांच्या समवेत मागील वर्षी पुराचा फटका बसलेले नागरिक उपस्थित होते.