राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा असताना बेळगावमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी झाली तर नेक्स्ट सीएम अर्थात पुढचा मुख्यमंत्री मीच असेन असे सांगून अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.
शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नाही, ती रिकामी झाली की नवा मुख्यमंत्री मीच असेन. मुख्यमंत्री बदल झाल्यास माझा नंबर नूतन मुख्यमंत्री म्हणून लागणार आहे, असे सांगून मंत्री उमेश कत्ती यांनी राजकीय वर्तुळात एक नवा बॉम्ब टाकला आहे. राज्य भाजप प्रधान कार्यदर्शी अरुण कुमार यांनी बोलाविलेल्या संघटनात्मक बैठकीसाठी मी आलो आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे.
हा बदल कोण करणार आहे हे अद्याप मला कळाले नाही. हुक्केरी मतदारसंघातील मतदारांनी मला 8 वेळा आमदार करून आशीर्वाद दिला आहे. आठ वेळा आमदार झाल्यानंतर मंत्री बनण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे 4 वेळा मंत्री बनवून मी जनसेवा केली आहे. एकंदर राज्याचा मुख्यमंत्री बनण्यासाठी आवश्यक सर्व पात्रता माझ्याकडे आहे. माझ्यावर कोणतेही किटाळ नाही, माझे व्यक्तिमत्व स्वच्छ कलंक रहित आहे, असेही उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनतेने आशीर्वाद दिला आणि पक्षाच्या हायकमांडने मनात आणले तर राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची माझी इच्छा पूर्ण होणार आहे. सध्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नाही. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही.
मात्र ती खाली झाल्यास नवे मुख्यमंत्रीपद उत्तर कर्नाटकाला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ज्येष्ठतेसह कलंक रहित सर्व पात्रता माझ्याकडे आहे. त्यामुळे नशीबाने साथ दिली आणि हायकमांडने निर्णय घेतला तर मीच नवा मुख्यमंत्री होईन अशी मला आशा आहे, असे मंत्री कत्ती यांनी सांगितले.