मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मला सोडून मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाहीत असा ठाम मला ठाम विश्वास आहे. यापूर्वी चार वेळा मी मंत्री झालो असून या मंत्रिमंडळ विस्तारात देखील मी मंत्री होईन असे मला वाटते, असे मत हुक्केरीचे आमदार व माजी मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री उमेश कत्ती यांनी यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. मी आठ वेळा आमदार झालो असल्यामुळे भविष्यात मी नक्की मुख्यमंत्री होईन, असे मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केले आहे. आता यावेळी मला जर मंत्रिपद मिळाले तर मी संपूर्ण कर्नाटकच्या विकासासाठी माझे योगदान देईन असेही ते म्हणाले.
दरम्यान, जगदीश शेट्टर यांनी मी मंत्रिमंडळाच्या विस्तारात सहभागी होणार नाही. मी मंत्री होणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मी कर्नाटकचा माजी मुख्यमंत्री आहे आणि माझ्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मी कसा सहभागी होऊ? मला माझा स्वाभिमान आहे. त्यामुळे मी बोम्मई सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा निर्धार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला आहे.
यावर बोलताना उमेश कत्ती यांनी शेट्टर यांचा तो वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगून त्यावर मी कांहीही भाष्य करणार नाही, असे सांगितले. जगदीश शेट्टर यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही? तो निर्णय हायकमांडच्या घेईल, असेही कत्ती म्हणाले.