बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिमंडळ विसर्जित केले आहे. आता उद्या बुधवारी भाजप विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडण्यात येणार आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेश भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री कोण? याविषयी राजकीय वर्तुळात औस्त्युक्य निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासूनच नवा मुख्यमंत्री कोण? याविषयी तर्कवितर्क लढविण्यात येत होते. सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्यासाठी बैठक झाली, मात्र निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदीय नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर निरीक्षक बेंगलोर येथे दाखल होतील. बेंगलोर येथे उद्या बुधवारी भाजप विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, पक्षाचे राष्ट्रीय संघटना सरचिटणीस बी. एल. संतोष, खाण उद्योग मंत्री मुरुगेश निराणी, आमदार अरविंद बेल्लद, गृहमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री अश्वत नारायण, विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, बसवनगौडा पाटील -यत्नाळ यांची नांवे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अजित सिंग यांनी सोमवारी बी. एस. येडीयुप्पा यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर भाष्य करण्यास नकार देऊन तो निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ आणि भाजप विधिमंडळ घेईल असे स्पष्ट केले आहे. मी आता कांही बोलणार नाही. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजप संसदीय मंडळ कर्नाटकच्या पुढील नव्या मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेईल, असे सिंग यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधिमंडळ बैठक केंव्हा होणार? या प्रश्नाला उत्तर देताना सध्या या क्षणी मी काही सांगू शकत नाही असेही ते म्हणाले.
बी. एस. येडियुरप्पा यांनी काल सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तसेच वयाची 75 वर्षे ओलांडली असतानाही आपल्याला मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला असला तरी नव्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक होईपर्यंत बी. एस. येडियुरप्पा हेच हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत. राजीनामा पत्र स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी त्यांना तशी सूचना केली आहे.