म्हादई वन्यजीव अभयारण्यातील एका वाघाचा जंगलातील कॅमेऱ्यात कैद झालेले छायाचित्र गोवा वनखात्याने सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे कर्नाटक आणि गोवा राज्यातील वन्यजीव कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत असून हा प्रकार शिकाऱ्यांना निमंत्रण देणारा असल्याचा आरोप केला जात आहे.
अलीकडेच महादाई वन्यजीव अभयारण्यातील एका कॅमेरामध्ये कैद झालेले वाघाचे छायाचित्र फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या छायाचित्रांमध्ये तारखेसह फोटोचे स्थळ स्पष्टपणे नमूद केलेले दिसून येत आहे.
या पद्धतीची संवेदनशील माहिती जनमानसात पसरविणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे वन्यजीव कार्यकर्त्यांचे मत आहे. यासंदर्भात सुप्रसिद्ध वन्यजीव कार्यकर्ते गिरीधर कुलकर्णी म्हणाले की, गोवा वनखात्याने व्हायरल केलेल्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर सांगावेसे वाटते कि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) या पद्धतीने वन्यजीवांची छायाचित्रे सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे.
या पद्धतीची छायाचित्रे शिकाऱ्यांना वन्यजीव शिकारीचा गुन्हा करण्यास प्रवृत्त करू शकत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे असे सांगून या प्रकारामुळे फक्त गोवाच नव्हे तर कर्नाटककडून व्याघ्र संवर्धनासाठी केले जाणारे प्रयत्न धोक्यात येणार आहेत.
कारण वाघाचे छायाचित्र कॅमेरात कैद झालेले ठिकाण हे गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे गोवा वन खात्याला यापुढे अधिक काळजी घ्यावी लागणार आहे असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
जयदीप सिद्दणावर या आणखी एका वन्यजीव कार्यकर्त्यांनी देखील वाघाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा हा प्रकार म्हणजे शिकाऱ्यांना शिकारीचा गुन्हा करण्यास प्रवृत्त करण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले.