टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) येथील रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले होते. मात्र याबाबत वारंवार विचारणा झाल्याने नैऋत्य रेल्वेच्या डीआरएम हुबळी यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात या ब्रिजचे काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नैऋत्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून तिसऱ्या रेल्वे गेट येथील रोड ओव्हर ब्रिजचे काम केले जात आहे. तथापि कोरोनाच्या संकटामुळे गेले कांही महिने हे बांधकाम प्रलंबित राहिले होते. मात्र सप्टेंबरपासून गिर्डर घालण्याचे काम सुरू करून यंदाच्या आर्थिक वर्षात रोड ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती नैऋत्य रेल्वेचे डीआरएम यांनी आज सायंकाळी 5:47 वाजता केलेल्या ट्विटद्वारे दिली आहे.
एकंदर या ट्विटनुसार सदर ब्रिजचे महत्त्वाचे काम पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून मार्च 2022 अखेर ते पूर्ण केले जाणार आहे.
टिळकवाडी तिसरा गेट येथील रोड ओव्हर ब्रिजचा कोनशिला समारंभ गेल्या 6 जानेवारी 2019 रोजी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या हस्ते झाला होता.
तसेच ब्रिज बांधून पूर्ण करण्याची मुदत मार्च -2020 देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली. या रोड ओव्हर ब्रीजसाठी 27.28 कोटी रुपये खर्च येणार असून मेसर्स कृषी इन्फ्राटेक या कंपनीला या ब्रिजच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. हा ब्रिज चौपदरी होणार आहे.