बंगळूर येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कित्तूर विकास प्राधिकरणाच्या १० कोटींच्या कृती आराखड्यास मान्यता दिली. कित्तूर मधील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०२१-२२ या साली प्राधिकरणाला १० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
या कृती आराखड्या अंतर्गत राणी चन्नम्मा यांच्या स्मारकाचे बांधकाम तसेच चौकी मठाचा विकास, कित्तूर राजवाड्याची प्रतिकृती यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
राणी चन्नम्मा यांच्या समाधी स्थळाचा विकास, बेळवडी येथे बेळवडी मल्लम्मा यांच्या पुतळ्याचे कामकाज आणि त्यांच्यासंदर्भातील इतिहासाची माहिती देणारा फलक, कित्तूर प्रांताच्या ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन याचप्रमाणे इतर कामकाजाचा या कृती आराखड्यात समावेश आहे.
या बैठकीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्राधिकरण विकास कृती आराखड्यांतर्गत १९ कोटी रुपयांच्या खर्चातून एकूण १०६ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. यापैकी १०४ प्रकल्प पूर्ण झाले आहे. राणी चन्नम्मा यांच्या राजवाड्याच्या विकास आणि पुनर्बांधणीचे करण्याचे निर्देश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी हे कामकाज पूर्ण करण्याकडे लक्ष पुरवावे, अशा सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिल्या.
या बैठकीला उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, मडीवाळेश्वर स्वामी, महसूल खात्याचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, प्राधिकरणाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.