शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शासनाने महानगरपालिकेकडे सोपविले असून बेळगाव शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना 26 जुलै ही डेडलाईन देण्यात आली आहे.
गेल्या मार्च महिन्यात आयुक्त जगदीश के. एच. यांनी बैठक घेऊन शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी महसूल कर्मचाऱ्यांकडे सोपवली होती. त्याचवेळी महसूल कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले होते.
मात्र बेळगाव लोकसभेची पोट निवडणूक जाहीर झाल्याने ती मोहीम पूर्ण झाली नव्हती. शिवाय एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला व लॉकडाऊन देखील लागू झाल्यामुळे ही मोहीमच थांबली होती.
आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. त्याआधी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना शासनाने महापालिकेला केली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी पुन्हा महसूल विभागाची बैठक घेऊन अर्ध्यावर थांबलेली शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम पूर्ण करण्याची सूचना केली आहे त्यासाठी येत्या 26 जुलैपर्यंत डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. महसूल कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे.
दरम्यान, यापूर्वी महापालिकेच्या महसूल विभागाकडे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी कधीच दिली गेली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच त्यांना हे काम करावे लागत आहे. घरपट्टी वसुली तसेच अन्य कामांसोबतच हे नवे काम त्यांना करावे लागत असल्यामुळे कामाचा ताण वाढल्याची महसूल कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.