बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना या ठिकाणी काल मंगळवारी दुपारी युवकांच्या टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शाबोद्दीन बॉम्बेवाले असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नांव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अँथोनी स्ट्रीट, कॅम्प येथील शाबोद्दीन बॉम्बेवाले यांच्या विवाहित बहिणीच्या घरासमोर काल मंगळवारी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात युवक जमा झाले होते.
त्यामुळे घाबरलेल्या बहिणीच्या नवर्याचा फोन येताच शाबोद्दीन त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी संबंधित युवकांना कृपया आमच्या घरासमोर गर्दी करू नका. येथून निघून जा, अशी विनंती केली. तेंव्हा जमा झालेल्या युवकांनी वादावादीस सुरुवात केली. या वादावादीचे पर्यवसान शाबोद्दीन बॉम्बेवाले यांच्यावर तलवारी व जांबियाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यामध्ये झाले.
या हल्ल्यात शबोद्दीन यांचा डावा हात मोडण्याबरोबरच डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळले. तेंव्हा आसपासच्या लोकांनी भांडण सोडवून शाबोद्दीन यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. त्याठिकाणी एमएलसी झाल्यानंतर त्यांना केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रारीसह गुन्हा नोंद झाला आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारा मागोमाग ही प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्यामुळे कॅम्प येथे गुन्हेगारीला ऊत येण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी शाबोद्दीन बॉम्बेवाले यांच्या हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करून कडक शासन करावे, अशी मागणी केली जात आहे.