स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले मंडोळी रोड या रस्त्याचे बांधकाम अद्यापही सुरू असताना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वेबसाइटवर मात्र या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेल्या विकास कामांच्या यादीत घालण्यात आल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड वेबसाइटच्या https://back.in/complete या पुर्ण झालेल्या विकास कामांचा तपशील असणाऱ्या पेजमध्ये मंडोळी रस्त्याचा अंतर्भाव आहे. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम अद्याप सुरूच आहे. मंडोळी रोड रस्त्याच्या ग्लास हाऊस प्रवेशद्वार ते लोटस कौंटीपर्यंतच्या एका बाजूचे काम अद्याप झालेले नाही. परिणामी हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. तथापि वेबसाईटमध्ये मात्र या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेले दाखविण्यात आले आहे. त्यामुळे किती विकास कामे पूर्ण झाली? कीती नाही? याची स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनाच माहिती असते की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मंडोळी रोड प्रकल्पामध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेन, अंडरग्राउंड डक्टिंग, व्हाइट टॉपिंग रोड, सायकलिंग ट्रॅक आणि फुटपाथ या कामांचा समावेश आहे. गेल्या जुलै 2017 मध्ये बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाची पहिली मुख्य निविदा काढण्यात आली ती म्हणजे मंडोळी रोड (पहिल्या रेल्वे गेटकडून एमजी रोडच्या कांही भागासह) आणि केपीटीसीएल रोड, नेहरूनगर या दोन रस्त्यांची होय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या या स्मार्ट रोड्ससाठी 20 कोटी 38 लाख 78 हजार 736.38 रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार असून वर्क ऑर्डर मिळालेल्या तारखेपासून 12 महिन्यांच्या मुदतीत या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याची अट होती. रस्त्यांच्या बांधकामाचे 23 कोटी 31 लाख 73 हजार 528 रुपयांचे कंत्राट नरेंद्र चुनीलाल पनानी यांच्या प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे.
मात्र मंडोळी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सीबीटी बस स्थानकानजीक गेल्या शनिवारी स्मार्ट सिटी विकास कामाच्या लोखंडी सळईने ज्याप्रमाणे एका इसमाचा बळी घेतला, तसा दिडवर्षापूर्वी मंडीळी रोडवर गटाराचे खोदकाम खुले ठेवल्यामुळे एका सायकलस्वाराचा बळी गेला होता.