एम. के. हुबळी (ता. कित्तूर) येथे केवळ 1500 रुपयांच्या वादातून धाबा चालकाचा खून केल्याप्रकरणी कित्तूर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद रफी उर्फ सद्दाम रफिकअहमद बडेगार, शब्बीरअहमद रफिकअहमद बडेगार, बिलाल अब्दुलहक बडेगार, सर्फराज महंमदशा बडेगार, शहाबाज मोहम्मदशा बडेगार, इरफान वोदिनशा बडेगार आणि साजिद शब्बीरअहमद बडेगार अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.
गेल्या रविवारी सायंकाळी एम. के. हुबळी येथील पंचवटी नांवाच्या धाब्याच्या ठिकाणी बिलाचे पैसे देण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान ढाबा चालक प्रकाश बसवराज नागनुर (वय 35, रा. बैलहोंगल) याचा खून करण्यामध्ये झाले होते.
बिलापोटी प्रकाशने 1500 रुपयाची मागणी केली असता, आमच्याकडे पैशाची मागणी कशाला करतोस? अशी विचारणा करत सात-आठ जणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून प्रकाशला बेदम मारहाण करण्याबरोबरच त्याच्या डोक्यात चहाच्या किटलीने प्रहार केला होता.
परिणामी गंभीर अवस्थेतील प्रकाश नागनुर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कित्तूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून उपरोक्त सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.