रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ काल शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून रो. मिलिंद पाटणकर यांनी अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली.
उद्यामबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकार्यांचा अधिकारग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे आणि इंस्टॉलेशन अधिकारी म्हणून क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. अजित कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी मावळते अध्यक्ष के. एम. केळुसकर यांच्या उपस्थितीत क्लबचे नूतन अध्यक्ष मिलिंद पाटणकर, सेक्रेटरी लक्ष्मीकांत नेतलकर, खजिनदार शील मिरजी, उपाध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, जॉइंट सेक्रेटरी अक्षय कुलकर्णी यांच्यासह जीवन खटाव, अल्पेश जैन, डॉ. सतीश धामणकर, अमित साठे, विक्रांत कुडाळे, मनोज मायकल, ॲड. सचिन बिच्चू आणि शैलेश मांगले या कार्यकारिणीच्या अन्य नुतन पदाधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार प्रदान करून अधिकारपदाची शपथ देवविली.
यावेळी आपल्या समयोचित भाषणात डॉ. अजित कुलकर्णी यांनी सध्याच्या परिस्थितीत रोटरीने सामाजिक गरज असणारे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे सांगून कोरोना महामारीच्या काळात रोटरी क्लब ऑफ बेळगावने राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबद्दल प्रशंसोद्गार काढले.
यावेळी रोटरी सहाय्यक प्रांतपाल डॉ. मनोज सुतार आणि विक्रम जैन यांच्या हस्ते क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर अधिकार ग्रहण समारंभाचे औचित्य साधून रोटरीच्या माध्यमातून दीर्घ समाजसेवा करणाऱ्या माजी अध्यक्ष डॉ. सतीश याळगी, डॉ. अजित कुलकर्णी, रवी संत आणि बापूसाहेब पाटील यांचा क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी लक्ष्मीकांत नेतलकर यांनी सचिवात्मक घोषणा केल्यानंतर उपाध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांनी सर्वांचे आभार मानले.
सूत्रसंचालन संतोष पाटील आणि श्रीमती सुकून नूरानी यांनी केले. समारंभास रोटरी क्लब ऑफ बेळगावचे मावळते अध्यक्ष के. एम. केळुसकर, बी. एम. विभुते, पराग भंडारी, सुरेश मेत्रानी, तुषार पाटील, डॉ. राजेंद्र भांडारकर आदींसह सर्व सदस्य, निमंत्रित आणि हितचिंतक उपस्थित होते.