सध्या पडणाऱ्या पावसामुळे आधुनिकीकरणाचे काम सुरू असलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक आवाराचे चित्र पूर्णपणे बदलून गेले असून संपूर्ण आवार चिखलाने माखून गेल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे बसस्थानक आवारात ठिकठिकाणी दगड मातीचे ढिगारे पडून आहेत.
सदर ढिगारे वेळीच हटविण्यात आले नसल्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण बस स्थानक आवारामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलाच्या दलदली बरोबरच ठिकठिकाणी गढूळ पाण्याची डबकी तयार झाली असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्वत्र चिखलमय वातावरण झाल्यामुळे बस पकडण्यासाठी मोठी कसरत करत प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे. ही धावपळ करताना बऱ्याचदा घसरून पडल्यामुळे प्रवाशांना आपले कपडे रंगवून घ्यावे लागत आहेत.
एकंदर बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक सध्या पूर्णपणे चिखलाने माखून गेले आहे. त्यामुळे केंव्हा एकदा मध्यवर्ती बस स्थानक आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होते आणि केंव्हा आपल्याला स्वच्छ सुंदर बस स्थानक पहावयास मिळते असे प्रवाशांना झाले आहे.