काँग्रेस बेळगाव जिल्हा अध्यक्षपदासाठी सुरस सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सतीश जारकीहोळी यांनी मिळविलेल्या मतांचा टक्क्यांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्या जागी नव्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सध्या काँग्रेस गोटात प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अनेक नांवे चर्चेत असली तरी मराठी भाषकाला हे पद देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
सतीश जारकीहोळी यांच्या यादीमध्ये अनेक मराठी नेत्यांची नाव अग्र क्रमांकावर येत आहेत जारकीहोळी यांनी या अगोदर अनेक मराठी नेत्यांना सत्तेत मोठमोठी पदे देऊ केली आहेत. रमेश गोरल मोहन मोरे यांना जिल्हा पंचायत स्थायी समिती अध्यक्षपद, अरुण कटांबळे यांना जिल्हा पंचायत उपाध्यक्ष तर युवराज कदम आणि निंगप्पा जाधव यांना ए पी एम सी अध्यक्ष पद दिले आहे. मराठी माणसाच्या मताचे राजकारण हे बेळगावच्या राजकारणात खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे यावेळी मराठी चेहरा पुढे आणण्याचे काम केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी जिल्हा महानगर काँग्रेस अध्यक्षपदी आप्पासाहेब पवार यांच्या सारखी माणसे होती तर अनेक मराठी माणसांनी भाजपा महानगर अध्यक्षपद सांभाळले आहे. सध्या शशिकांत पाटील हे बेळगाव महानगर भाजपचे अध्यक्ष आहेत. भाजपचा महानगर अध्यक्ष मराठी असू शकतो तर काँग्रेसचा का होऊ शकत नाही? त्यामुळे रमेश गोरल सारख्या निष्ठावंताला काँग्रेस जिल्हाध्यक्ष का करू नये? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तेंव्हा याकडे सतीश जारकीहोळी यांनी लक्ष देऊन मराठी माणसाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अन्य इच्छुकांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले बसवराज शेगावी, माजी मंत्री दिवंगत व्ही. एस. कौजलगी यांचे पुत्र राजदीप कौजलगी आदींचा या इच्छुकांमध्ये समावेश आहे.
दुसरीकडे बेळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी कोणत्याही वादाला थारा न देता आणि समन्वय राखत पदभार सांभाळला आहे. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत नावलगट्टी जिल्हाध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याची मागणी देखील एका गटाकडून केली जात आहे.