धाब्यांमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने आता शहर आणि तालुक्यातील सर्व धाबा चालकांसाठी स्थानिक पातळीवरील व्यवसाय परवाना बंधनकारक केला आहे. तसेच सर्वांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे आहे, असा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बजावला आहे.
पोलिस उपायुक्तांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडून सर्व धाबा चालकांना सूचना करून व्यवसाय परवान्यांची तपासणी केली जात आहे. शहर आणि तालुक्यात हॉटेल्स व धाबे मोठ्या प्रमाणात आहेत.
मात्र यापैकी बहुतांश जणांकडे व्यवसाय परवाना नसल्याचे दिसून आले आहे. कांही धाबा चालक बेकायदेशीर मद्यविक्री करण्याबरोबरच इतर अंमली पदार्थांचीही विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिस खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
या व्यतिरिक्त धाब्याच्या ठिकाणी वादावादी आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पोलीस खात्याने व्यवसाय परवाना व सीसीटीव्ही कॅमेरा याची खबरदारी घेतली आहे.
आता यापुढे धाबा चालकांना धाब्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे असणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासह कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करणे ही जरुरीचे असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून आपापल्या पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या धाब्यांना भेटी देऊन व्यवसाय परवाना तपासला जात आहे.