येळ्ळूर येथील किल्ले राजहंस गडाच्या ठिकाणी ओली पार्टी करणाऱ्या युवकांच्या एका टोळक्याची पार्टी उधळून स्थानिक शिवभक्त कार्यकर्त्यांनी त्यांना चांगला दम देण्याबरोबरच क्षमा मागावयास लावून हाकलून लावल्याची घटना आज शनिवारी घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहर परिसरातील काही तरुण आज शनिवारी येळ्ळूर राजहंस गडाच्या पायथ्याशी मद्यपान करत असल्याची माहिती स्थानिक युवक आणि शिवभक्तांना मिळाली. तेंव्हा मनोज केरवाडकर, सोमनाथ नावगेकर, सागर कुंडेकर, मोनेश्री थोरात, नारायण कुंडेकर व इतर शिवभक्तांनी तात्काळ गडाच्या पायथ्याशी धाव घेऊन त्या मद्यपी युवकांच्या टोळक्याला गाठले.
गांगरलेल्या त्या टोळक्याला शिवभक्त आणि धारेवर धरून चांगलाच दम भरला. तसेच गड-किल्ल्यावर पुन्हा अशा प्रकारचे कोणतेही गैरवर्तन होणार नाही असे वदवून घेऊन हाकलून लावण्याद्वारे त्यांना चांगलाच धडा शिकवला.
कोणाचाही वचक नसल्यामुळे अलिकडे येळ्ळूर राजहंस गडाच्या ठिकाणी ओल्या पार्ट्या करण्यात येत आहेत. गड परिसरात मोकळे वातावरण आणि मुबलक जागा असल्याने या ठिकाणी गुपचूप दारू -मटणाच्या पार्ट्या केल्या जातात. तसेच शिल्लक मांस मटण, दारूच्या बाटल्या -पाकिटे तिथेच फेकून अस्वच्छता केली जाते.
त्यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत आहे. तेंव्हा यापुढे राजहंस गडावर किंवा त्याच्या पायथ्याशी कोणीही दारू पार्टी आणि मांसाहार करू नये. जर असे प्रकार कोणी करताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा स्थानिक शिवभक्त युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.