ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सध्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या शालेय मुलांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. नेटवर्क कॅच करण्यासाठी बिचाऱ्या या मुलांवर धडपडत चक्क डोंगरमाथ्यावर जाऊन आपला गृहपाठ करण्याची वेळ आली आहे.
कोरोना महामारीमुळे सध्या शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अंमलात आणली जात आहे. ही शिक्षण पद्धत शहरातील मुलांसाठी सोयीची ठरली असली तरी ग्रामीण भागातील मुलांना नेटवर्कच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात दुर्गम भागात असलेल्या बहुतांश खेडेगावांमध्ये तर मोबाईल नेटवर्कचा पत्ताच नसतो. त्यामुळे या ठिकाणच्या शालेय मुलांना मोठ्या बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. गावात नेटवर्क मिळत नसल्यामुळे या ठिकाणच्या मुलांवर डोंगर चढून नेटवर्क मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
सध्या खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील ठिकठिकाणच्या डोंगरावर मुले छत्रीच्या आडोशाला नेटवर्क कॅच करून आपला गृहपाठ करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मुलांच्या मदतीला आता खानापूरचे आमदार डॉ अंजली निंबाळकर धावून आल्या असून त्यांनी मोबाईल कंपन्यांना यावर कांही तरी तोडगा काढण्याची विनंती केली असल्याचे समजते.