नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे उचगाव ते गोजगा गावादरम्यानच्या रस्त्यासह नव्याने बांधलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले असून मोठी गैरसोय होत आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असताना दुसरीकडे पुलांची स्थिती केविलवाणी झाली आहे. नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात उचगाव ते गोजगा गावादरम्यानचा सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता वाहून गेला आहे.
हीच अवस्था गोजगे गावानजीक या रस्त्यावर अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची झाली आहे. रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यामुळे या मार्गाची वाताहत झाली आहे. सध्या या रस्त्यावरून चार चाकी वाहन नेणे अशक्य असून दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.
उचगाव -गोजगा रस्त्याची पार दुर्दशा होण्याबरोबरच पुराच्या पाण्यामुळे या रस्त्यावरील दगड माती आजूबाजूच्या शेत जमिनीत पसरली आहे. परिणामी येथील भात पिकाचे नुकसान होऊन शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तरी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबरोबरच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.