यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांचे वितरण होण्यास विलंब होणार असल्याने शाळांना बुक बँक तयार करण्याची सूचना करण्यात आली असली तरी येत्या 15 दिवसात नव्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच नवी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकं वितरण लवकर होणार नसल्याचे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने सर्व शाळांना आधीच्या वर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून मागून बुक बँक तयार करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार अनेक पालकांनी आपल्या मुलांची पुस्तके शाळांमध्ये आणून दिली आहेत. तसेच ही पुस्तके विद्यार्थ्यांना लवकरच दिली जातील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आता विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 दिवसात म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच येत्या कांही दिवसात विविध विषयांची पुस्तके गोदामात पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर विभागवार पुस्तके दिली जातील, अशी माहितीही शिक्षण खात्याकडून देण्यात आली आहे.