Thursday, November 28, 2024

/

संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक तिसऱ्या पिढीसाठी : प्रा. मेणसे

 belgaum

महाराष्ट्र -कर्नाटक अर्थात बेळगाव सीमाप्रश्नावर आणखी एक पुस्तक येत असून ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या शीर्षकाचे हे नवे 336 पानी पुस्तक बेळगावचे प्रा. आनंद मेणसे यांनी लिहिले आहे. मराठी भाषिकांच्या तिसऱ्या पिढीला सीमाप्रश्न कळावा, आंदोलन कळावे आणि त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे, अशी माहिती सीमालढ्याचे जाणकार प्रा. मेणसे यांनी बेळगाव Liveशी बोलताना दिली.

आपल्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती देताना प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, महाराष्ट्र -कर्नाटक (बेळगाव) सीमाप्रश्नावर अद्याप कोणीही पुस्तक लिहिलेले नाही. तरुणपणी सीमा लढ्यात काम केले असल्यामुळे आणि माझे वडील कृष्णा मेणसे पहिल्यापासून सीमा लढ्यात असल्यामुळे आपण हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करावा असे वाटले आणि या प्रयत्नातून मी 336 पानी पुस्तक लिहू शकलो. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या 21 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यामध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या माझ्या पुस्तकात तत्कालीन दुर्मिळ फोटो आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना कशी झाली? तिचे संस्थापक नेमके कोण होते? पहिली कमिटी कोणती? ती कशी विस्तारित झाली आणि प्रत्यक्षात सीमा प्रश्नांची ठिणगी बेळगावात कशी पडली याची माहिती या पुस्तकात आहे.

हे पुस्तक प्रामुख्याने मराठी भाषिकांच्या सध्याच्या तिसऱ्या पिढीसाठी म्हणजे सध्या कॉलेजला वगैरे जात असलेल्या मुलांना लढा समजावा या हेतूने लिहिले आहे. या मुलांच्या हातात हे पुस्तक गेले पाहिजे असे मला वाटते असे सांगून शहरातील ज्येष्ठ -जाणकार नागरिक माझा वाचक नाहीत, ही तिसरी पिढी माझा वाचक आहे. आपण सर्वजण दुसऱ्या पिढीतील आहोत. माझे वडील कृष्णा मेणसे आणि जेष्ठ वकील राम आपटे हे दोघेचं पहिल्या पिढीतील जुने नेते सध्या हयात आहेत. तेंव्हा तिसऱ्या पिढीला सीमा प्रश्नासंदर्भात कांहीतरी साहित्य द्यावे, या उद्देशाने मी या पुस्तकाचे लेखन केले आहे, असे प्रा. मेणसे असे यांनी स्पष्ट केले.Book border issue

सीमाप्रश्नी बेळगावात कोण कोणत्या चळवळी झाल्या. उदाहरणार्थ 17 जानेवारी 1956 चा गोळीबार, 9 मार्चपासूनचा सत्याग्रह, या सत्याग्रहाचे पहिले पर्व, दुसरे पर्व आणि तिसरे पर्व म्हणजे साराबंदी आंदोलन. यांची माहिती ‘संघर्ष महाराष्ट्र विलीन होण्यासाठी’ या माझ्या पुस्तकात आहे. थोडक्यात 1956 पासून 1961 सालापर्यंत बेळगावात सातत्याने झालेल्या आंदोलनाची, त्यात सहभागी झालेल्या लोकांसह तारीख वार माहिती मी पुस्तकात दिली आहे. या पुस्तकात निगेटिव्ह नकारार्थी असे कांहीही छापलेले नाही. कोणाच्या चुका वगैरे काढलेल्या नाहीत. जी आंदोलने झाली ती लोकांना माहीत झाली पाहिजेत आणि त्यापासून प्रेरणा घेऊन लोकांनी पुढे गेले पाहिजे हा हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा हेतू आहे असेही ते म्हणाले.

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांची माहिती या पुस्तकामध्ये आहे. सीमाप्रश्नी कोणकोणते आयोग नेमले गेले, त्यांनी कसे अहवाल दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधीजींनी आपल्या मृत्यूपूर्वी चार दिवस आधी एक पत्र लिहून ‘भाषावार प्रांतरचना झालीच पाहिजे’ अशी व्यक्त केलेली इच्छा, पोट्टीलागू या इसमाने भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे या मागणीसाठी सलग 69 दिवस केलेले ऐतिहासिक उपोषण, त्यामध्ये झालेले त्यांचे निधन आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे भाषावार प्रांतरचनेची झालेली अंमलबजावणी आदी माहिती या पुस्तकात वाचावयास मिळणार आहे. थोडक्यात काय तर, बेळगाव सीमा लढ्याचा सकारात्मक इतिहास मी माझ्या पुस्तकाद्वारे लोकांसमोर आणत आहे, असे प्रा. आनंद मेणसे यांनी शेवटी सांगितले.Mense anand

मुंबई येथील प्रा. दीपक पवार यांनी यापूर्वी सीमाप्रश्नावर एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कांही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते माननीय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. आता प्रा. पवार यांच्या पुस्तकामागोमाग पुढील महिन्यात बेळगावचे प्रा. आनंद मेणसे यांचे सीमाप्रश्नावरील हे नवे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.