माध्यान्ह आहार वितरणात भ्रष्टाचाराचे प्रकार समोर येत असल्यामुळे शिक्षण खात्याने यापुढे माध्यान्ह आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच बँकेत बचत खाते उघडावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिकता वाढावी यासाठी शिक्षण खात्याने गेल्या कांही वर्षांपासून माध्यान्ह आहार योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. अनेक वर्षे शाळेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांना जेवण तर शनिवारी नाश्ता किंवा पुलावचे वाटप केले जाते.
मात्र कोरोना संकटामुळे शाळा बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही विद्यार्थ्यांना प्रति महिनाप्रमाणे धान्य व इतर साहित्याचे वाटप केले जात आहे. मात्र धान्य वाटप करताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी गेल्या कांही दिवसांपासून शिक्षण खात्याकडे वाढल्या आहेत.
या तक्रारींमुळे स्वयंसेवी संस्था किंवा इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याची सूचना कांही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने सर्व शाळांना केली होती. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे.
आता सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर माध्यान्ह आहाराची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स खाते काढावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी खाते काढण्यात आले आहे, त्या विद्यार्थ्यांना नवीन खाते काढण्याची गरज नसल्याची माहिती देण्यात आली आहे.