एकीकडे कोरोनाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असली तरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. तज्ञांच्या मते गेल्या 4 जुलै रोजीच कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून त्याची प्रचिती येऊ लागली आहे. बेळगाव जिल्ह्यात आज बुधवारी नव्याने 140 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून सक्रीय रुग्ण संख्या 2070 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात नव्याने 140 रुग्ण आढळून येण्याबरोबरच कोरोनामुळे आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा 833 झाला आहे. आज दिवसभरात 4050 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज 73 जणांना कोरोना मुक्त झाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात आज बुधवारी नव्याने 1990 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत बेळगाव जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक 2234 कोरोना बाधित रुग्ण 19 मे 2021 रोजी आढळून आले होते. तसेच सर्वाधिक 4270 रुग्णांना 1 जून 2021 रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.