केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्यास महाराष्ट्र व केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना माघारी धाडले जात आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. तथापि महाराष्ट्र व केरळ राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र आरटी -पीसीआर निगेटिव्ह तपासणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी आज शनिवारी 31 जुलैपासून सुरू झाली आहे.
सीमेवरील चेकपोस्ट अर्थात तपासणी नाकाच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी तपासणीसह सर्व माहिती नोंद करूनच परराज्यातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. येथील पोलिसांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना चांचणी संबंधित कागदपत्रे तपासूनच प्रत्येकाला कर्नाटकात प्रवेश देण्याची सूचना आलेले आहेत.
महाराष्ट्र व केरळ आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या कोगनोळी चेक पोस्टवर आरटी -पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास खबरदारी म्हणून प्रवाशांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले होते, ते नसेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते.
मात्र आता लसीच्या दोन्ही डोसा आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता प्रवाशांकडून झाली नाही तर त्यांची तात्काळ रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. या टेस्ट अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त टेस्टचा अहवाल पाॅझेटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशांना नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.