महाराष्ट्र सरकारच्या नव्या आदेशानुसार कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. तसे असल्यास त्यांना आरटी -पीसीआर सक्तीतून वगळले जाईल. मात्र जर एकच डोस घेतला असेल तर त्यांना आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नव्या आदेशानुसार कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेतलेल्याला किमान 15 दिवस झाले असले पाहिजेत, जेणेकरून कोविन पोर्टलकडून मिळणाऱ्या अंतिम लसीकरण प्रमाणपत्रासाठी ते पात्र असतील.
या तऱ्हेने लसीकरणाच्या दोन्ही डोसांची पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रातील प्रवेशासाठी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राच्या सक्तीतून वगळले जाईल. जर प्रवाशाने कोरोना प्रतिबंधक लसीचा फक्त एकच डोस घेतला असेल तर त्यांच्यासाठी 72 तासापेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.
स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी हा आदेश लागू असेल. लसीकरण नियमांची पूर्तता केली असली तरी प्रवाशांना सक्तीने फेस मास्क वापरणे, सातत्याने हातांचे निर्जंतुकीकरण करणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे सदासर्वदा काटेकोर पालन करावे लागेल.
दरम्यान, सर्व प्रवाशांसाठी आरटी -पीसीआर चांचणीचा कालावधी 48 तासावरून 72 तास इतका वाढविण्यात आला आहे.