महापालिकेच्या बांधकाम खाते, महसूल खाते आणि भूमी अभिलेखा खात्याकडून बेळगाव शहरातील सर्व 15 तलावांमधील अतिक्रमणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर लागलीच संबंधीत तलावांमधील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी गेल्या 17 जून रोजी महापालिकेत बैठक घेऊन शहरातील तलावांमधील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी शहरातील 15 तलावांची यादी देखील महसूल व बांधकाम खात्याकडे देण्यात आली होती.
शहरातील 15 पैकी 14 तलाव हे जिल्हा पंचायतीच्या मालकीचे आहेत. किल्ला तलाव महापालिकेच्या मालकीचा आहे. त्यामुळे 14 तलावांशी संबंधित माहिती आवश्यक असेल तर जिल्हा पंचायतीच्या बांधकाम खात्याकडून घेण्याची सूचना देण्यात आली होती. आता आयुक्तांच्या सूचनेनुसार तलाव सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
अनगोळ येथील चार तलाव, कणबर्गी येथील तीन तलाव, अलारवाडमधील दोन तलाव, बसवन कुडची, मजगाव, वड्डर छावणी, मंगाईनगर आणि जुने बेळगाव येथील प्रत्येकी एका तलावाचा यादीत समावेश आहे. तलावांमधील अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाची मुख्य जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम खात्याकडे देण्यात आली आहे. तसेच मनुष्यबळाची कमतरता असेल तर महापालिकेच्या महसूल विभागाची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे.
तथापि प्रत्यक्षात सर्वेक्षणामध्ये महसूल खात्याचे कर्मचारीच आघाडीवर आहेत. तलावांची हद्द कुठपर्यंत आहे, याची माहिती घेण्यासाठी भूमी अभिलेखा खात्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, शहरातील नाल्यांची हद्द निश्चित केली जात असून गेल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाला आणि तलावांसंदर्भातील मोहिमा आता एकाच वेळी राबविल्या जात आहेत.