राज्यातील पहिली ते आठवी वर्गाच्या शाळा शिक्षक नेमणुकीसाठी केआरटीईटी -2021 ही कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 22 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. सुरेश कुमार यांनी जाहीर केले आहे.
केआरटीईटी -2021 परीक्षा 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे.
या परीक्षेची प्रश्नपत्रिका 150 गुणांची असणार असून प्रवेशपत्रे 12 ऑगस्ट रोजी ऑनलाईन (schooleducation.kar.nic.in) उपलब्ध केली जातील, ती उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत, असेही शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी सांगितले.
पहिली ते पाचवी वर्गाच्या शिक्षक पदासाठी टीईटी अर्ज दाखल करणारा उमेदवार पीयूसी आणि डीएड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे सहावी ते आठवी वर्गाच्या शिक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर आणि डीएड किंवा बीए -बीएड किंवा बीएस्सी -बीएड असणे आवश्यक आहे.
डीएड, बीएड, बीएस्सी परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणारे देखील या शिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ही आहे.