खानापूर तालुक्यातील पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती, मराठी शिक्षकांची नियुक्ती आणि दुर्गम भागात अडचणीत आलेली ऑनलाइन शिक्षण पद्धती यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज सोमवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्विकार करून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून पडणारा मुसळधार पाऊस आणि दुर्गम भागातील शाळांची झालेली पडझड पाहता नूतन इमारतीचे काम कांही ठिकाणी संथ गतीने तर कांही ठिकाणी बंद आहेत.
त्या शाळांच्या विकासाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळांमध्ये मराठी शिक्षकांची भरती रखडली असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, हे आमच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे.
शाळा बंद असल्याने खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात जो तालुक्याचा दुर्गम भाग आहे या भागातील पारवाड, चिखले, सडा, चोर्ला, हुळंद, जामगाव, हेम्माडगा व इतर भागातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जात आहे. तथापि त्या भागात मोबाईल रेंज येत नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना पडला आहे. त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी विनंतीपूर्वक आम्ही करत आहोत अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष परशुराम (पिंटू) नावलकर, किशोर हेब्बाळकर, अनंतराव जुमवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, गोपाळ पाटील, रणजीत पाटील, धर्मा पाटील, गोपाळ कुट्रे, ईश्वर देगावकर, विलास देसाई, रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते.