प्रवाशांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सुळगे -येळ्ळूर रस्त्यावर उभारलेल्या त्या दिशादर्शक फलकामुळे कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या (कनसे) बुडाला आग लागली आहे.
मराठीतून लावण्यात आलेल्या या दिशादर्शक फलकामुळे पोटशूळ उठलेल्या कनसे कार्यकर्त्यांनी लोकहितासाठी दिशादर्शक फलक लावणाऱ्या सेवाभावी मराठी कार्यकर्त्यांकडे बोट करीत थेट ‘समाजकंटक’ असे शब्द वापरून आपला कटू शमवून घेतला आहे.
सुळगे -येळ्ळूर नजीकच्या फाट्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी दिशादर्शक फलक उभारावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली होती. परंतु त्या मागणीची पूर्तता न झाल्याने जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या सहकार्याने तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुळगे -येळ्ळूर येथे दिशादर्शक फलक लावला होता.
मात्र मराठीचे वावडे असणाऱ्या कांही समाजकंटकांनी तो फलक लावण्याचा उदात्त हेतू लक्षात न घेता फलक उचकटून टाकला होता. सेवाभावी कार्यकर्त्यांनी त्या फलकाची पुन्हा उभारणी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येऊन त्यांनी तो तात्पुरता फलक काढून त्याठिकाणी कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषेतील अधिकृत असा कायमस्वरूपी सरकारी दिशादर्शक फलक बसविला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे.
तथापि त्यानंतर पोटशूळ उठलेल्या कनसे कंपूने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन मैलांच्या दगडावर केवळ कन्नड भाषेचा वापर केला जावा असे सांगत अप्रत्यक्षरीत्या सुळगे -येळ्ळूर येथे मराठी दिशादर्शक फलक उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजकंटक असे संबोधून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.
दरम्यान, कनसे कंपुच्या प्रसिद्धीसाठी चाललेल्या या खटाटोपचा निषेध करून अकारण वाद निर्माण करून सामाजिक वातावरण गढूळ करू पाहणाऱ्या आणि समाजोपयोगी कार्याला ‘खो’ घालणाऱ्या अशा लोकांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे, असे मत सुज्ञ नागरिकातून व्यक्त केले जात आहे.