कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या सर्वांगिन विकासासाठी सीआयआय संघटनेच्या बेळगाव येथील उद्योजक सदस्यांनी एकूण 15 लाख 85 हजार रुपयांची देणगी देऊ केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटलच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन प्रादेशिक आयुक्त व बीम्सचे प्रशासक अमलान आदित्य बिश्वास यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगावातील सीआयआयच्या सदस्यांनी काल शुक्रवारी उपरोक्त आर्थिक मदतीचे धनादेश बीम्सचे प्रशासक अमलान बिश्वास यांच्याकडे सुपूर्द केले.
याप्रसंगी सीआयआय बेळगावचे चेअरमन व व्हेगा ऑटो एसेसरीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिंडक, सीआयआयचे व्हा. चेअरमन व स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिश मेत्राणी, अशोक आयर्न ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी, ओरिऑन हायड्रोलिक्सचे क्रिष्टोफ मचाडो, मिलीसा मचाडो आदी उद्योजक उपस्थित होते.
शहरातील विविध उद्योजकांनी बीम्सला पुढील प्रमाणे आर्थिक मदत देऊ केली आहे. जय भारत फाउंडेशन (अशोक आयर्न ग्रुप) -5 लाख रुपये, नेतलकर इंजिनियर्स -5 लाख रु., शांती फाऊमॅक -2 लाख रु., व्हेगा ऑटो एसेसरीज -1 लाख रु., स्नेहम फाउंडेशन (स्नेहम इंटरनॅशनल) -1 लाख रु., रेक. फ्लो टेक्नॉलॉजीस एलएलपी -50 हजार रु.,
ओरिऑन हायड्रॉलिक्स -50 हजार रु., बेळगाव फेरो कास्ट इंडिया प्रा. लि. -50 हजार रु. सर्वो कंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रा. लि. -25 हजार रु. आणि एक्सपर्ट इंजिनिअरिंग इंटरप्राईजेस -10 हजार रुपये. सदर मदतीचा धनादेश स्वीकारून बिम्सचे प्रशासक अमलान आदित्य बिश्वास यांनी संबंधित सर्व उद्योजकांचे आभार मानून धन्यवाद दिले आहेत.