खासबागच्या पुढे असलेल्या येडियुरप्पा रोड येथे एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाकडून मालवाहतूक गाड्या रस्त्यावर आडव्या लावून वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण केला जात आहे. याकडे पोलिसांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
जुने बेळगाव येडियुरप्पा रोडवर एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ठिकाणी रोज सकाळी अवजड वाहने येतात. वाहनातील साहित्य उतरवण्यासाठी ती वाहने रस्त्यावर आडवी लावली जातात. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी तक्रार देऊन देखील पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सदर रस्त्यावरून सकाळच्या वेळेत या भागातील नागरिक व कर्मचारी कामासाठी जात असतात. या रस्त्यावर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात असते. ट्रान्सपोर्ट कंपनीची अवजड वाहने रस्त्याच्या मधोमध आडवी लावल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. जर अपघातात कोणी दगावल्यास त्याला ट्रान्सपोर्ट व्यवसायिकदार जबाबदार राहील, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाचे पोलिस खात्यात वरपर्यंत हात पोचले असल्यामुळे तो कोणाचीही कदर न करता मनमानी करत असल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे या भागातील सामान्य नागरिकांचे जीवित धोक्यात आले आहे.
तरी एखाद्याचा जीव जाण्याची वाट न पाहता पोलीस खात्यासह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित ट्रान्सपोर्ट मालकाला चांगली समज द्यावी आणि मालवाहू वाहनांचा रहदारीला होणारा अडथळा दूर करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.