कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली व रामामेस्त्री अड्डा या भागात रस्त्याशेजारी पडलेल्या एका वृद्धाला श्री कपिलनाथ युवक मंडळ व श्री बाल शिवजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केल्याची घटना काल घडली.
कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली व रामामेस्त्री अड्डा या भागात काल गुरुवारी सायंकाळी आणखी एक वृध्द जखमी अवस्थेत पडला असल्याचे कांही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. गेल्या दोन दिवसापासून भांदूर गल्ली रेल्वे फाटकानजीक सदर वृद्ध असहाय्य अवस्थेत पडून होता.
याची माहिती मिळताच या भागातील समाज सेवक कपिल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली श्री कपिलनाथ युवक मंडळ व श्री बाल शिवाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या वृद्धाला भेटून विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपले नांव सुनिल असून आपण अनगोळ येथील रहिवासी असल्याचे सांगितले. आपल्याला घरच्यांनी बाहेर काढल्याने मिळेल त्या जागी राहून दिवस काढत असल्याचेही स्पष्ट केले.
तेंव्हा मंडळाचे कार्यकर्ते जयशिल मुरकुटे, महेश लगाडे, महादेव कदम ,श्रीधर देसाई, राहुल मण्णुरकर, सचिन तीपुकडे, रोहन रायचुरकर, संकेत पाटुकले, मिझान नारंगीवाले, दर्शन सावगावकर, दिनेश चव्हाण, सनिल मुरकुटे आणि अभीषेक मन्नोळकर यांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर यांना मदतीची विनंती केली.
सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या संघटनेच्या रुग्णवाहिकेसह तातडीने मदतीला धावून येताना अभिषेक पुजारी, भरत नागरोळी, निलेश वेर्णेकर यांच्या मदतीने संबंधित वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.