बेळगाव शहरातील हनुमाननगर येथील रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात आढळून आलेल्या बिबट्याचा शोध आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी जारी होता. बिबट्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच सावज बाधून सापळे रचण्यात आले आहेत.
रेसकोर्स मैदानावर सकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांनी आपल्याला बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वनखात्याला दिल्यामुळे काल सकाळपासून वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
रेसकोर्स मैदानाशेजारीच वनक्षेत्र असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबट्या रेसकोर्सवर आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. वनखात्याच्या विशेष पथकाने काल दिवसभर रेसकोर्स व आजुबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा इतर कोणतीच बाब निदर्शनास आली नाही.
आता त्या बिबट्याला पकडण्यासाठी रेसकोर्स येथील झाडेझुडपे असणाऱ्या भागात वेगवेगळ्या 7 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दोन ठिकाणी जाळी बसवण्याबरोबरच एके ठिकाणी बकरी आणि दुसऱ्या ठिकाणी कुत्रे बांधून सापळा रचण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या आढळून आलेला नाही किंवा त्याची कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. दरम्यान आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा शोध जारी ठेवताना आला होता.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 15 जण या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. या सर्वांनी गटागटाने पुन्हा एकदा रेसकोर्स आणि आसपासचा परिसर तसेच नजीकच्या वनक्षेत्रात बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि सायंकाळपर्यंत बिबट्याचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे लोकांना दिसलेला तो प्राणी बिबट्याच होता की दुसरा कोणता प्राणी होता? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.