सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या भिंती लगतच्या स्वच्छतेबाबत बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन ग्रामपंचायतीने ती जागा स्वच्छ केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या भिंतीलगत नेहमीच अस्वच्छता दिसून येते होती. याठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे असे प्रकार होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे या शाळेलगतच ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे.
तसेच गावचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या सदर शाळेलगतच तीन अंगणवाडी, ग्रामदैवत दुर्गादेवी मंदिर आणि वाजपेयी जनस्नेही केंद्र आहे. त्यामुळे शाळेलगतच्या त्या स्वच्छतेबद्दल गेल्या 10 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करून बेळगाव लाईव्हने आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेऊन सांबरा ग्रामपंचायतीने शाळेलगतचा संबंधित केरकचरा हटवून ती जागा स्वच्छ केली आहे.
ग्रामपंचायतीच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून धन्यवाद दिले जात आहेत. तसेच यापुढे संबंधित ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी घेताना त्या ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही केली जात आहे.