सरकारचे हिवाळी अधिवेशन सोडले तर उर्वरित काळात कुचकामी असणारी बेळगावची सुवर्ण विधानसौध इमारत ‘पांढरा हत्ती’ आहे हे सर्वश्रुत आहे.
आता या इमारतीच्या 1 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीतील इमारत साफसफाई, पर्यवेक्षण आदी देखभाली संदर्भातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून एकूण 1 कोटी 98 लाख 55 हजार 985.25 रुपये किंमतीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारतीच्या देखभाली संदर्भात काढण्यात आलेल्या निविदांची एकूण किंमत लक्षात घेता निर्दिष्ट कालावधीत सदर इमारतीच्या देखभालीसाठी दरमहा 16 लाख 54 हजार 665.4375 रुपये मोजावे लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने साफसफाई वगैरे संदर्भात काढलेल्या निवेदन व्यतिरिक्त पुढील बाबींसाठी देखील निविदा काढण्यात आले आहेत.
नव्या नेटवर्क केबलींगसह ऑडिओ कॉन्फरन्स सिस्टीमची पुनर्स्थापना, ऑडिओ -व्हिडिओ केबलींग, एचडीएमआय केबलिंग, ऑडिओ -व्हिडिओ सिस्टिमचे एकत्रीकरण सॉफ्टवेअरची सुधारणा, अतिरिक्त ध्वनी मजबुतीकरण, सुवर्ण सौध सभागृहातील सीसीटीव्ही सुरक्षा निरीक्षण यंत्रणेच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग संदर्भातील दुरुस्ती. सदर बाबींसाठी निविदा काढण्यात आल्या असल्या तरी त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
या व्यतिरिक्त पुढील प्रमाणे अन्य कांही कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. सुवर्ण सौधमधील आरटीआय आयुक्तांच्या न्यायालयातील व्यासपीठ दुरुस्त करणे, दरवाज्यांचे पॉलिशिंग आदी कामांसाठी 2 लाख 55 हजार 165.26 रुपये. तसेच संबंधित न्यायालयातील वीज पुरवठ्यासंदर्भातील कामांसाठी 1 लाख 86 हजार 852.4 रुपये.