Sunday, January 5, 2025

/

तर मी मुख्यमंत्री पद सोडेन….येडीयुरप्पा?

 belgaum

उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकातही मोठा बदल करण्याची भाजपने तयारी केली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची खुर्ची धोक्यात आले असून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या बंडाळीमुळे भाजपने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. कॉंग्रेसला सत्तेवरुन खाली खेचत येडियुरप्पांनी भाजपाची सत्ता स्थापन केली होती. परंतु त्यांची एकाधिकारशाही भाजपच्या नेत्यांना रुचली नसल्याने कांही काळातच त्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती.

येडियुरप्पा यांनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी. एस. राघवेंद्र याला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा भाजप उपाध्यक्ष बी. एस. विजेंद्र याला राज्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा त्या तीन अटी आहेत.

भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने येडियुरप्पांना आज दिल्लीला पाचारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यावर आपल्या खुर्चीला धोका नसल्याचे वक्तव्य येडियुरप्पा यांनी केले आहे. परंतु भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने त्या समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

बी. एस. येडियुरप्पा यांनी 2012 मध्ये भाजपा सोडून नवा पक्ष स्थापन केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केजेपी पक्षाला एकूण 9.8 टक्के मते मिळाली होती. तसेच सहा आमदार निवडून आले होते. त्यात येडियुरप्पा व शोभा करंदलाजे हे होते. त्यावेळी भाजपलाही मोठी झळ बसली होती. यानंतर येडीयुरप्पा यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढविली होती.

लोकसभेला जिंकले व राज्यातील निवडणुकीवेळी त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले. निजद -काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर येडियुरप्पा यांचा पुत्र बी. एस. विजयेंद्र यांनी सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपाच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. प्रकरण बंडापर्यंत पोचले होते. यामुळे कर्नाटक सारखे मोठे राज्य हातचे जाऊ नये म्हणून भाजप मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे.

ही नांवे आहेत चर्चेत… येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी सध्या कांही नांवे चर्चेत आहेत. येत्या 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. केंद्रात मंत्री असलेले प्रल्हाद जोशी, खाणमंत्री मुरुगेश निराणी, गृहमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष आणि माजी मंत्री बसवनगौडा पाटील -यत्नाळ यांची नांवे चर्चेत आहेत. यत्नाळ यांनीच येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडियुरप्पा यांचे लाड पुरवते की यत्नाळ यांना मुख्यमंत्री करते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.