बेळगावच्या सिटी सर्व्हे ऑफिसचे (भू नोंदणी) डिजिटलायझेशन केले जावे, अशी मागणी शनिवार खुट, बेळगाव येथील रहिवासी गणेश नंदगडकर यांनी केली असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांना सादर केले आहे.
गणेश नंदगडकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहराची केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झाली आहे. हे शहर राज्याची दुसरी राजधानी असून देखील येथील सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये (भु -नोंदणी) अद्यापही नकाशे, उतारे आदी गोष्टी हस्तलिखित स्वरूपात मिळतात.
आता बेळगाव शहराचे लवकरच स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होणार असल्यामुळे या ठिकाणच्या सरकारी कार्यालयांचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे. शहर सर्वेक्षण खाते अर्थात सिटी सर्व्हे डिपार्टमेंट हे संपूर्ण शहराची भू नोंदणी ठेवत असले तरी जनतेला डिजिटलायझेशन रेकॉर्ड (सर्टिफाइड कॉपी) देण्यात मात्र हे खाते मागासलेले आहे. आता आपण एकविसाव्या शतकात आहोत, परंतु सिटी सर्व्हे कार्यालयात अद्यापही खाडाखोड असलेली जुनी हस्तलिखित पद्धत वापरली जात आहे, ही डिजिटल युगाकडे वाटचाल करणाऱ्या बेळगाववासियांसाठी शरमेची बाब आहे.
कामकाज हस्तलिखित स्वरूपात होत असल्यामुळे आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस वाट पहावी लागते. आज-काल ग्रामीण पातळीवर भूमी पोर्टल, पंचायत पातळीवर ई-सेतू पोर्टल आणि महापालिकेचे ई -अस्ती पोर्टल याद्वारे संबंधित कागदपत्रे आपल्याला तात्काळ उपलब्ध होतात. याबाबतीत सिटी सर्व्हे ऑफिस मात्र अपयशी ठरले आहे.
तेंव्हा बेळगाव सिटी सर्व्हे ऑफिसचे लवकरात लवकर डिजिटलायझेशन केले जावे आणि त्यासाठी एक खास समिती नियुक्त केली जावी. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये विनय नेताजी चव्हाण यांची नियुक्ती केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी आनंदगडकर यांच्यासमवेत राजू चव्हाण, सुरज पाटील, अभिषेक कुरणे, लखन चव्हाण, संतोष खांडरे, सागर जांबोटकर, गौरव अनगोळकर आणि अमित कांबळे उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाच्या प्रती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देखील धाडण्यात आल्या आहेत.