बेळगाव शहरातील इंद्र कॉलनी -कोळी गल्ली( जिल्हा पंचायत कार्यालया मागील बाजू)येथील सार्वजनिक मालमत्ता असलेले केईबी मीटरचे नुकसान करणाऱ्यांसह सरकारी कूपनलिकेच्या मुख्य पाईपलाईनमधून स्वतःच्या घरासाठी कनेक्शन घेणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक प्रदेश सोशल वर्कर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
इंद्र कॉलनी, कोळी गल्ली येथील कांही रहिवाशांनी या ठिकाणच्या केईबी मीटरचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे कांही लोकांनी पाण्याचा केव्हाही वापर करता यावा यासाठी जिल्हा पंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या इंद्रा कॉलनीतील इंद्र निवासनजीकच्या सरकारी कूपनलिकेच्या मुख्य पाईपलाईनमधून स्वतःच्या घरासाठी बेकायदा पाण्याचे कनेक्शन घेतले आहे. सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या कूपनलिकेच्या बाबतीत घडलेल्या या प्रकारामुळे गेल्या कांही महिन्यांपासून पाण्याच्या नियोजनावरून भांडणे होत आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून पंपाच्या मशीनची दुरुस्ती असल्यामुळे पाणी पुरवठा खात्याने या भागातील पिण्याच्या पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे काल स्थानिक लोकांनी बेकायदा कूपनलिकेच्या पाण्याचे कनेक्शन घेणाऱ्या नागरिकांना पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्याची विनंती केली असता.
त्यांनी पाणी नियोजनास नकार देऊन भांडणास सुरुवात केली. हा प्रकार यापूर्वीही बऱ्याच वेळा घडला आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्वेक्षण करण्याद्वारे केईबी मीटरसह कूपनलिकेच्या पाईपलाईनचे नुकसान करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित खात्याला द्यावेत, आशयाचा तपशील इंद्र कॉलनी, कोळी गल्ली येथील रहिवाशांच्यावतीने कर्नाटक प्रदेश सोशल वर्कर्स असोसिएशनने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.