राज्याचे नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी लॉबिंग सुरू झाले असून यामध्ये ज्येष्ठ नेत्यांसह नवोदित देखील आघाडीवर आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके हे मराठा समाजाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्यामुळे सोशल मीडियावर मंत्रिपदासाठी त्यांच्या नांवाची मागणी वाढू लागली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 13 आमदारांपैकी प्रत्येक जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असून कोणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषता आमदार अनिल बेनके हे बेळगावातील मराठा समाजातील भाजपचे एकमेव आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जावे, अशी मागणी केली जात आहे. मराठा परिषदेकडून सोशल मीडियावर अनिल बेनके यांना मंत्रीपद द्यावे, अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या जात आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आपल्या पदावरून पायउतार झाल्यानंतर बसवराज बोम्मई यांचे राज्य कर्नाटकातले असून बोम्मई यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आहे.
आता सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला स्थान मिळणार? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात 5 मंत्री होते. त्यापैकी रमेश जारकीहोळी यांनी नंतर राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चार झाली होती. तेंव्हा आता बोम्मई मंत्रिमंडळात बेळगावातील किती जणांना संधी मिळणार? याबाबत तर्क लढविले जात आहेत.
मंत्रिमंडळाची पहिली यादी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोणाचा मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत समावेश होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या संभाव्य यादीत बेळगाव जिल्ह्यातील उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी आणि पी. राजीव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदर नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातील किती जणांना स्थान मिळणार? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.