सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारी मुळे बेळगाव सह देशात दळणवळण तसेच प्रवासी सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे .एकीकडे कोरोना काळात विमान प्रवाससेवेत मोठी घट झालेली पाहायला दिसते मात्र बेळगाव विमानतळ मात्र याला काहीसे अपवाद ठरले आहे.
दरम्यान कोरोनाच्या काळात बेळगावच्या सांबरा विमानतळावरून 2021 एप्रिल ते जून या तीन महिन्यात 51 हजार 190 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.
कोरोना काळातील विमानतळ कार्याचा आढावा घेतल्यास बेळगाव विमानतळावरील कामगिरी अत्यंत कौतुकास्पद मानली जात आहे. बेळगाव चे सांबरा विमानतळ कर्नाटक राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ ठरले आहे.
बेळगावचे सांबरा विमानतळ कर्नाटक राज्यातील सर्वात जुने ब्रिटिश कालीन विमानतळ आहे.2021 एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सांबरा विमानतळावरून 1640 विमान फेऱ्या झाल्या आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत 51190 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.
2020-21 या वर्षात तब्बल 2 लाख 58 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. त्यामुळेच कर्नाटकची राजधानी बेंगळूरु व मंगळूरु नंतर बेळगावचे सांबरा विमानतळ राज्यातील सर्वात व्यग्र विमानतळ ठरले आहे.
सध्या बेळगाव सांबरा विमानतळावरून बेंगलोर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, मुंबई, मैसूर, कडप्पा, जोधपुर,सुरत, तिरुपती व नाशिक,इंदोर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. सांबरा विमानतळाचे कार्यकारी संचालक राजेश मोर्य यांनी आपल्या कारकीर्दीत विमानतळाची कामगिरी उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.