बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या गावातील 19,035 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
बेळगाव जिल्ह्यात सध्या 89 निवारा (काळजी) केंद्रे उभारण्यात आली असून त्यामध्ये एकूण 8,795 जणांना तात्काळ आश्रय देण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या गावांमधील 19,035 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटात जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील 37 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले असून सध्या कोणतीही समस्या नाही. सर्व तालुक्यातील नोडल अधिकारी पूर परिस्थिती आणि पावसाच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवुन आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण आहे.
एखाद्या वेळेस कांही समस्या निर्माण झाली तर नागरिकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी, असे ते म्हणाले. नद्यांची पाणीपातळी वाढली असल्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.