बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेण्याबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
आज अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकार्यांनी उपरोक्त माहिती दिली. सद्य परिस्थितीत खानापूर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात अन्यत्र कुठेही जीवित हानी झालेली नाही.
पूर परिस्थिती हाताळणी याबरोबरच मदत कार्यासाठी बोटींसह एसडीआरएफचे 60 जवान सज्ज आहेत. त्यांच्या ठराविक तुकड्या करून गोकाक, खानापूर आदी आवश्यक ठिकाणी पाठविल्या जातील. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.
निपाणी तालुक्यातील पुरामुळे निराश्रित झालेल्यांसाठी 7 निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. मात्र संबंधित निराश्रित आपापल्या नातेवाइकांकडे जाणे पसंत करत आहेत. जे निराश्रित निवारा केंद्रात राहू इच्छितात, त्यांना त्याठिकाणी आणून त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करून त्यांना चांगले जेवणखान दिले जात आहे, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कोयना जलाशय परिसरात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. काल माझी बोलणी झाली त्यावेळी त्या जलाशयात 65 टीएमसी पाणी होते. मुसळधार पावसामुळे आज एका दिवसात या जलाशयातील पाणीसाठा 13 टीएमसी इतका वाढला आहे. त्यामुळे कोयना जलाशयातून आज पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मात्र तो अल्पप्रमाणात आहे, जर तो मोठ्या प्रमाणात झाला असता तर आपल्याला प्रचंड खबरदारी घ्यावी लागली असती असे सांगून कल्लोळी धरणाचे मोजमाप पाहून आम्ही अलमट्टीचा विसर्ग किती ठेवायचा आहे ठरवू. सध्या सर्व ठिकाणी आमचे नियंत्रण कक्ष आहेत. कोरोना संदर्भात आम्ही जे नियंत्रण कक्ष उभारले होते, तेच कक्ष आता अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत आहेत. काळजी करण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शेवटी स्पष्ट केले.