आजपासून येत्या 15 जुलैपर्यंत बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय योजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
बेळगाव जिल्ह्यात आजपासून 15 जुलैपर्यंत व्यापक प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय योजना संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्ह्यातील सखल भागातील तसेच पूर परिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या प्रदेशातील लोकांना खबरदारीचा इशारा दिला जावा. त्याचप्रमाणे या लोकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना तयार ठेवाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अति पर्जन्यवृष्टी अथवा पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक तालुक्याला नोडल अधिकारी नेमण्यात आले असून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे जनतेने काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहेत